वेध परिवारातील सर्वाना नमस्कार ….
आपल्यापैकी बरेच जण वाबळे वाडीच्या आंतरराष्ट्रीय शाळेला भेट देवून आला आहात. काही लोक जाणार आहेत तर काहींनी विविध ठीकारावरून शाळेबाबत जाणून घेतले आहे. यात वेध ग्रुप वरील शेयरिंग चा मोठा वाटा आहे. मी मागील एक पोस्ट मध्ये आपल्या कार्यक्षेत्रात करता येणाऱ्या बाबींचे चार प्रकारात वर्गीकरण केले होते.
- १) बाबी ज्या फक्त मार्गदर्शन केल्याने भेट दिलेले सर्व शिक्षक कार्यन्वित करू शकतील.
- २) बाबी ज्यासाठी निधी व लोकसहभाग लागणार तरी सुद्धा मार्गदर्शन केल्याने भेट दिलेले बरेच शिक्षक कार्यान्वीतकरू शकतील.
- ३) बाबी ज्यासाठी खूप अधिक निधी व लोकसहभाग लागणार त्यामुळे मार्गदर्शन करून सुद्धा एखादीच शाळा आणि शिक्षक करू शकतील.
- ४) बाबी ज्या शासनाच्या प्रशासकीय मदती शिवाय शक्य नाही.
वरील पैकी पहिल्या गटात येणाऱ्या आणि सर्वाना करता येणाऱ्या अनेक बाबी वाबळे वाडीच्या शाळेत दिसून आल्या. वाबळे वाडीच्या शाळेचा प्रगती आलेख पाहता आपल्या हेही लक्षात आलेच असेल कि पहिल्या गटातील बाबीच आधी केल्या गेल्या आहेत. यावरून आपणास हि बाब शिकावयास मिळते कि आपल्या कार्यक्षेत्रात पहिल्या गटातील बाबीच आपल्याया आधी कराव्या लागतील. वाबळे वाडीच्या शाळेत निदर्शनास आलेली व सर्वांना भावणारी बाब म्हणजे तेथील मुले तीन महिन्यात आपला पाठ्यक्रम पूर्ण करतात. यातील महत्वपूर्ण बाब म्हणजे त्यातील बऱ्याचश्या बाबी ते स्वतः किंवा विषय मित्रांच्या मदतीने शिकतात. आवश्यक वाटल्यास शिक्षकांची मदत घेतात. सदर बाब पहिल्या गटात येणारी आणि सर्वाना करता येणारी आहे. याचाच अर्थ हि बाब आपल्या कार्यक्षेत्रात करण्यास अधिक वाव आहे. वेध समूहात शिक्षक, केंद्रप्रमुख ,विस्तार अधिकारी अशी विविध पदावर काम करणारी मंडळी आहे. वरील बाब प्रत्येकाला आपल्या कार्यक्षेत्रात करता येणारी आहे.किंबहुना काहींनी तसे करण्यास सुरवात पण केली असेल. ज्यांनी सुरवात केली असेल व जे करणार आहेत त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा…असे करत असतांना किंवा करावयाचे असल्यास काही बाबींचा विचार होणे अभिप्रेत आहे.
विद्यार्थ्यांनी तीन महिन्यात पाठ्यपुस्तक का पूर्ण करावे? पाठ्यपुस्तक जर तीन महिन्यात पूर्ण झाले तर पुढे काय करावे? आपल्या विद्यार्थ्यांनी स्वतः तीन महिन्यात पाठ्यपुस्तक पूर्ण करावे,हे कसे शक्य झाले असेल?(आमची तर तक्रार असते कि मुले होमवर्क करत नाहीत) शिक्षकांनी मुलांना असे काय सांगितले असेल ज्यामुळे मुले प्रेरित झालीत?
वरील बाबीचा वयक्तिक पातळीवर विचार करता सहज करता येणे शक्य आहे परंतु विद्यार्थ्यांनी प्रेरित होवून असे करणे यासाठी पूर्वतयारी व मेहनतीची गरज आहे. यासाठी वाबळे वाडीची शाळा नक्कीच आपल्याला मदत करेल.
रायपुर ला झालेल्या परिषदेत व अक्षय च्या शाळेतही या बाबतीत चर्चा झाली. त्या शाळेतील तिसऱ्या वर्गातील मुलांनीही हे आव्हान स्वीकारले आहे.जर तिसऱ्या वर्गातील मुल हे आव्हान स्वीकारत असतील तर निश्चितच इतर मुलही ते करू शकतील. प्रश्न हाच आहे कि आपण त्यांना प्रेरित कसे करणार व त्यांना ते पूर्ण करण्यासाठी मदत कशी उपलब्ध करून देणार. पाठ्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय काय करता येणार आहे याची स्पष्टता मुलांना आली कि ते प्रेरित होतील. फक्त जे करायला मिळणार आहे ते आनंद देणारे,कुतूहल निर्माण करणारे असावे लागणार आहे. त्यासाठी वाबळे वाडी शाळे संदर्भातील खालील अभिप्राय आपल्याला मदत करतील..
30 सप्टेंबर पर्यंत शालेय अभ्यासक्रम पूर्ण. होय ! ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे.पण तितकीच खरी आहे. आपण नेहमी ओरड ऐकतो Syllabus काही केल्या पूर्ण होत नाही. पण आश्चर्य म्हणजे या शाळेचा Syllabus सप्टेंबर महिन्यातच पूर्ण होतो ते ही संपूर्ण संपादणुकीसह…! याचे कारण या शाळेने निर्माण केलेला ‘एकात्मिक अभ्यासक्रम’. वेगवेगळ्या इयत्तांमधील समान संकल्पना एकाच वेळी विद्यार्थ्यांना शिकवल्याने विद्यार्थ्यांची धारणा पक्की होते व जशी इयत्ता वाढते तशा सर्व संकल्पना आधीच झाल्याने वेळ वाचतो व Syllabus पूर्ण होतो.उर्वरित वेळेत विद्यार्थ्यांना अनेक वेगवेगळ्या विषयांचे दालन खुले होते. वाबळेवाडी शाळेत मुलांना शिकण्यासाठी इयत्ताचे बंधन नाही. प्रत्येकाच्या अध्ययन पातळीनुसार अन गरजेनुसार मुलं एकत्र बसून अभ्यास करतात.
वाबळेवाडीत पारंपारिक/ पुस्तकी शालेय शिक्षण अभ्यासक्रम 30 सप्टेंबरपर्यंत मुलं पुर्ण करतात . याचे महत्वाचे कारण म्हणजे येथील संकल्पना आधारित शिक्षण पद्धती. प्राथमिकच्या वर्गातील सर्व विषयातील समान, किंवा साधर्म्य असलेले भाग एकत्र करणे.मग त्या सर्व वर्गांना एकत्रितपणे तो विषयभाग वेगवेगळ्या प्रकारे समजावणे. उदा:- पाणी . पाणी या घटकाला धरून मराठी, परिसर अभ्यास ,विज्ञान. इंग्लिश. इतिहास, भूगोल, गणित या सर्व विषयाला कसा स्पर्श करतात बघा. पावसावर – पाण्यावर आधारित मराठीतील सर्व इयत्तेतील कविता वाचन ,गायन समजून घेणे- कविता शिकत असतांनाच वारे सरांनी खालील विषय कसे हाताळले ते बघा. आपल्याला पाणी कोठून मिळते? पाण्याचे उपयोग मुलाकडून काढून घेणे. कोरडा दुष्काळ म्हणजे काय? शुद्ध पाणी कसे मिळवतात? पाणी शुद्ध (फिल्टर) का करावे लागते? पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय? पाणी प्रदूषण टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? घरी, शेतात, उद्योगात, हॉटेलात पाण्याची बचत कशी करता येईल? शेतात आधुनिक जल नियोजन कसे करता येईल? एक व्यक्तीला दिवसभरात किती लिटर पाण्याची आवश्यकता असते? एक व्यक्ती एका वर्षात एक व्यक्ती किती पाणी वापरतो? कमी पाण्यावर येणारी पिके कोणती? जास्त पाण्याची आवश्यकता असणारी पिके कोणती? दुष्काळी भागात कोणती पिके घेतली जातात? पाणी संकट टाळण्यासाठी सध्या लोक काय उपाय करत आहेत? दुष्काळ टाळण्यासाठी भूतकाळात काय उपाय केलेले आहेत? फिल्टर मधून वाया जाणाऱ्या पाण्याचा कसा चांगला उपयोग करता येईल? नदी पुनर्जीवन म्हणजे काय? पृथ्वीवर पाण्याची विभागणी कशी? या प्रकारे एकत्रित अन समग्र अध्ययन झाल्याने मुलाचा अभ्यासक्रम 30 सप्टेंबर पर्यंत संपतोच. करण इतर विषयातील हा भाग नव्याने शिकावा-शिकवावा लागत नाही .
एका विषयातून अनेक विषय शिकणे-शिकवणे* :- इयत्ता पहिलीच्या वर्गात– मुलांना एक विषय देतात.त्या विषयाची पुढील चार ते पाच दिवस वर्गात चर्चा होते. शिक्षकही मुलासोबत चर्चा करतात, प्रश्न विचारतात, चर्चेला आणखी व्यापक रूप देतात. एक विषय चार ते पाच दिवस चालतो. उदाहरणार्थ ‘आंबा’ आंबा या विषयाला धरून मुलांनी सर्व प्रकारची माहिती गोळा करावी त्याने ती सांगावी. आता या विषयावर मुलं काय सांगतात बघा-
- १) आंब्याच्या विविध जाती जसे- केशर, हापूस, लंगडा, पेवंदी, तोतपरी, पायरी, गोटी.
- २) आंब्याच्या चवी.
- ३) आंब्याचे अनेक उपयोग.
- ४) आंब्याचा सध्याचा बाजारभाव.
- ५) आंब्यासाठी लागणारी जमीन.
- ६) वेगवेगळ्या भागातील प्रसिद्ध आंब्याच्या जाती.
- ७) आंब्याच्या फळाचा मोहोर ते कैरी ते आंबा हा प्रवास त्यातील बदलांचे सुक्ष्म निरीक्षण ते मांडतात.
- ८) मग कैरीचे उपयोग काय? आंब्याचे उपयोग काय? तेही सांगतात.
- ९) आंब्याच्या फळाचे निरीक्षण सांगतात. उदाहरणार्थ -आंब्यात एक बी असते, कोय, कोयीत आणखी एक छोटे बी असते. पिकलेल्या आंब्याचा रंग हिरवा, पिवळा, लाल असे देखील असतो.
अशाप्रकारे एका विषयावर विविध अंगाने चर्चा होऊन, तो विषय परिपूर्ण माहीत करून घेतला जातो. अन हे सगळं इयत्ता पहिलीच्या वर्गात घडतं.
मुलं कशी प्रेरित झाली? शाळेत – 1)रोबोटिक्स 2)इलेक्ट्रिक कार 3) साऊंड इंजिनियरिंग 4)डिझायनिंग 5)थ्रीडी प्रिंटिंग 6) शॉर्ट फिल्म मेकिंग 7) एडिटिंग 8) म्युझिक रेकॉर्डिंग 9) वेस्ट मॅनेजमेंट या सारख्या प्रोजेक्टवर काम केले जाते. यात मुले दिवसरात्र रमलेली असतात. त्यांना दिवसभरात वेळेचं बंधन नाही. ज्यांना ज्या प्रोजेक्ट मध्ये सहभागी व्हायचं असेल त्या सर्व मुलांनी आपला अभ्यासक्रम 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावा. तरच त्यांना त्या प्रोजेक्टमध्ये सहभागी केलं जातं. ही एकच गोष्ट मुलांना दिवस-रात्र मेहनत करून आपला अभ्यासक्रम 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याची प्रेरणा देते.
वरील सर्व बाबीवरून आपल्या लक्षात आलेच असेल कि आपल्या कार्यक्षेत्रात हि आपल्याला असे करता येईल. कामास सुरवात केली कि हळूहळू पुढे जाता येईल. यासाठी काही ROADMAP किंवा प्रशिक्षणाची गरज भासेल तेंव्हा तेही करूयात. प्राधान्याने हे काम आपणास सुरु करता येईल. या साठी सर्वाना पुन्हा एकदा शुभेच्छा….
नंदकुमार